राष्ट्राध्यक्षीय गुर्मीची कहाणी

 

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने

शनिवार, १९ मार्च २०११
क्युबाहून निघालेले आमचे खास विमान पॅसिफिक महासागरावरून अमेरिकन हवाई हद्दीचा जराही भंग होत नाही याची काळजी घेत सिडनीला उतरले. साडेतीन वर्ष इजिप्शियन पाकिस्तानी आणि शेवटी अमेरिकन उन्मत्त तुरूंगाधिकाऱ्यांनी लाथा बुक्क्यांनी तुडविलेला मामदू हबीब हा निरलस, निर्दोष ४९ वर्षांचा तरूण, पण आता जख्खड म्हातारा दिसणारा माझ्या बरोबर होता. त्याची तरूण पत्नी मागेच मरण पावली म्हणून त्याला तुरूंगात सांगण्यात आल्याने, अजून खचलेला मोठय़ा कष्टाने सहा आसनी विमानात चढला आणि एका कोपऱ्यात बसलेल्या आपल्या पत्नीला पाहून कोसळलाच. ते दृश्य, त्या भावना माझे हृदय विदीर्ण करून गेल्या. मृत्यूची शिक्षा झालेल्यांचे, त्यांच्या शेवटच्या क्षणाचे साक्षीदार असण्याचे प्रसंग माझ्यावर आले, पण मी एवढा त्या वेळी वा कधीही गलबलून गेलो नव्हतो.
अनेक अट्टल गुन्हेगारांचे वा निष्पापांचे खटले चालविणाऱ्या जोसेफ मारग्युलिस या निष्णात अमेरिकन कायदेतज्ज्ञांनी लिहिलेल्या- ‘GUANTANAMO AND THE ABUSE OF PRESIDENTIAL POWER’ या पुस्तकातील मनोगतातच लिहिलेला हा प्रसंग. त्यांनी वर्णन केलेले मामदू हबीबचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य या पुस्तकाची ओळख तर करून देतेच, पण त्याहीपेक्षा त्याच्यासारख्या अनेकांची बरबादी करणाऱ्या अमेरिकन बुश सरकारच्या नीचतेची घृणा यावी एवढी लक्तरे वेशीवर टांगते.
जोसेफ मारग्युलिस (JOSEPH MARGULIES) हे स्वत: मॅक. आर्थर जस्टीस सेंटरमध्ये निष्णात कायदेतज्ज्ञ (Attorney) म्हणून काम करतात आणि शिकागोमधील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमध्ये प्राध्यापकीही.
११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेची शान ट्विन टॉवर्स भुईसपाट झाले आणि बुश सरकारचा द्वेषाग्नी ज्वालामुखीसारखा उफाळून आला. जगभर चाललेल्या या पूर्वीच्या हिंसक कारवाया किंवा स्वत: घडवून आणलेली, प्रोत्साहित केलेली दहशतवादी संघटनांची हत्याकांडे इकडे पूर्ण डोळेझाक केली. अमेरिका स्वत:वर झालेल्या या हल्ल्यामुळे दहशतवादाच्या बिमोडास रातोरात सज्ज झाली. त्याच दिवशी संध्याकाळी प्रेसिडेंट बुश यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात तालिबान, अल-कायदा या संघटनांची जगभरातील सारी पाळेमळे उखडून टाकण्याकरिता कोणतेही कायदेशीर- बेकायदेशीर पाऊल उचलण्याची घोषणा केली आणि साऱ्या जगानेही त्यास साथ द्यावी म्हणून आवाहन केले. अमेरिकन काँग्रेसने प्रेसिडेंट बुश यांना तिसऱ्याच दिवशी म्हणजे १४ सप्टेंबर रोजी ‘काहीही करण्याचे’ अर्निबध अधिकार दिले आणि त्यातूनच नंतर उभी राहिली, वाढली, फोफावली GUANTANAMO ही क्युबामधील अमेरिकन हवाई दलाची बेटावरील छळछावणी.
लेखकाने या पुस्तकात ही सुरूवातीपासूनची जन्माची कहाणी विशद केली आहे. बुश यांच्या बेमुर्वत वर्तनाचे दाखले जागोजागी दिले आहेत. संस्कृती रक्षणाकरिता (Ciivlized Society) किती असंस्कृत पातळी बुश यांनी गाठली याचा उत्तम नमुना म्हणजे त्यांनी छळछावणीकरिता निवडलेली आपल्या देशाबाहेरची क्युबामधील जागा, जिथे अमेरिकन कायदेकानून लागू होत नाहीत वा ज्या जिनिव्हा करारावर अमेरिकेने स्वाक्षरी करून पालनाचे वचन दिले त्याची कोणतीही मात्रा इथे चालत नाही. या पद्धतीने स्वत:ला जगासमोर कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून न घेता बुश यांनी सारी यंत्रणा स्वत:च्या हातात केंद्रित करत सैन्य दलांच्या प्रमुखांचे अधिकार आपसूक हस्तगत करून घेत ‘गुआंटानामो’ हे भयानक क्रूर कसायांचे केंद्र केले. उद्देश फक्त जे कोणी बुश यांना धोकादायक वाटतील त्यांना पूर्णपणे संपविणे!जोसेफ माग्र्युलिस या जंगल कायद्यामुळे अस्वस्थ झाले. गुआंटानामो ही अत्यंत बंदिस्त, प्रचंड संरक्षणानी वेढलेली आणि नाझींच्या गॅस चेंबर्सप्रमाणे केवळ शहाण्णव तासांत उभारलेली यम यातनांची छळछावणी होती. जगभरातील कोणत्याही देशातून त्या देशाच्या सहभागाशिवाय कोणाही संशयित वाटणाऱ्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून उचलण्याचे, त्याला बेकायदा अटक करून पळवून नेण्याचे, कोणतेही कारण, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया याचे बंधन नसलेले अधिकार बुश यांनी बळजबरीने वापरण्यास सुरुवात करून ४० देशांतून अनेकांना पळवून नेऊन गुआंटानामोमध्ये स्थानबद्ध केले. जास्तीत जास्त भरणा मुस्लिम लोकांचा अगदी बारा वर्षांच्या मुलापासून साठीपर्यंतच्या साऱ्यांचा होता. या सर्व ‘कैद्यांना’ एकदा हाती घेऊन गुआंटानामोमध्ये ढकलले की ती अमेरिकेची खासगी मालमत्ता म्हणून जाहीर व्हायची. त्या कैद्यांना वा त्यांच्या वतीने कोणालाही काहीही माहिती विचारण्याचा, कोर्टात जाण्याचा अधिकार काढून घेतला. किती दिवसांकरिता, कोणत्या गुन्ह्यांकरिता आत टाकले याचा वर्षांनुवर्षे उत्तर न देण्याचा अधिकार अमेरिकेने स्वत:कडे राखून ठेवला होता.
'PRESIDENTIAL ABUSE' बुश यांच्या अंगी किती पराकोटीचा भिनलेला होता आणि कोणत्याही श्रेणीच्या क्रूरतेची अंमलबजावणी करण्याची मानसिकता त्यांनी अधिकाऱ्यांमध्येही रूजविली याची वर्णने या पुस्तकात वाचताना अंगावर काटा येतो. शफीक रसूल, आसिफ इक्बाल, मामदू हबीब अल् कायदानी हे इंग्लंड ऑस्ट्रेलियामधील तरूण. सुट्टीवर कुणी लग्नासाठी म्हणून आपल्या देशात गेले आणि अल् कायदाचे हस्तक म्हणून त्यांना घोषित करून पाकिस्तान- अफगाणिस्तानमधून अटक करून रातोरात क्युबाच्या अंधार कोठडीत अर्निबध काळाकरिता लोटले गेले.एफ.बी.आय. व ‘टाइम’ मासिकाने या गुप्त छळछावणीचे वृत्त प्रसिद्ध करेपर्यंत तब्बल साडेतीन/ चार वर्षे शेकडो मुली-तरूण आपले आयुष्य, भवितव्य गमावून बसले होते. बेकायदेशीररीत्या तुरुंगात डांबल्याचे वृत्त बाहेर येताच शफीक रसूल व इतर विरुद्ध जॉर्ज बुश हा खटला अमेरिकेत उभा राहिला तो जोसेफ माग्र्युलिस, या कायदेतज्ज्ञाच्या सहभागामुळे. तीन महिने सतत अंधाऱ्या कोठडीत कैद्याला हातपाय बांधून कोपऱ्यात विष्टा केलेल्या ठिकाणी पोक काढून बसायला लावणे, जगाशी, उजेडाशी, हवेशी जराही संपर्क येऊ न देणे. आठ-आठ तास केव्हाही प्रचंड मारहाण करत, गुप्तांगाला प्रचंड वेदना देऊन पिरगळत चाबकाचे फटके मार देत, न केलेला गुन्हा कबूल करायला लावण्याचे प्रकार हा गुआंटानामोचा नित्यक्रम होता. कानठळ्या बसतील एवढय़ा जोराने गाणी कैद्याच्या कानाशी अहोरात्र ऐकविणे, एक मिनीटही झोपू न देणे, जरा डोळे मिटले की पाण्याचा फवारा मारून ताठ उभे राहण्यास भाग पाडणे यासारखी व याहूनही विकृत कृत्ये गुआंटानामोमध्ये इरेला पेटून अमेरिकन अधिकारी संपूर्ण सुरक्षिततेच्या कवचाखाली या एकविसाव्या शतकात जगातील संपन्न देशाचे नागरिक म्हणून अभिमानाने पार पाडत होते.‘कैदी’ म्हणून ठरविलेल्या अनेक सामान्य माणसांचे, मुलांचे मृत्यू या कोठडीत झाले. कुणी आत्महत्या केल्या, कुणी ठार वेडे झाले, कुणी भ्रमिष्ट झाले तर मामदूसारखे कुणी भावूक मुला-पत्नीच्या आठवणीत स्वत:चा देहच विसरून गेले. शफीक रसूलसारखा तरूण बुशविरुद्ध खटला लढण्यास त्याही खडतर मरण यातनात उभा राहिला आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे मोठेपण जाणणारे प्रो. जोसेफ माग्युलिस आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात खेचण्यात यशस्वी झाले.  जगभरच्या राज्यकर्त्यांमध्ये व स्थानिक प्रशासनामध्येसुद्धा वाममार्गानी मिळविलेल्या पैशामुळे व सत्ता हाती असल्यामुळे सामान्यांना गृहीत धरण्याची वृत्ती वाढती आहे. एकूणच नीती नियम, सभ्यता याचे झपाटय़ाने दिवसें न् दिवस अवमूल्यन होते आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्याचे, राज्यकर्त्यांचे खरे रंगरूप ओळखण्याचे त्याला आव्हान देण्याचे आत्मबळ हे पुस्तक वाचून निश्चितच मिळेल.
कुमार नवाथे
गुआंटानामो अ‍ॅण्ड द अब्युज ऑफ प्रेसडिन्शियल पॉवर;
लेखक : जोसेफ मारग्युलस;
प्रकाशक : सिमॉन अ‍ॅण्ड शुश्टर पॅपेबॅक, न्यूयॉर्क;
किंमत : १५ अमेरकिन डॉल