फीलिंग हॉट हॉट हॉट!

 

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने

शुक्रवार , १३ मे २०११
ऋतुंमधील बदलांचा त्वचेवर परिणाम होतो हे आपल्याला माहीत आहेच. त्यात आपल्याकडचा उन्हाळा हा आपल्या त्वचेवर खूप तीव्र असतो. म्हणून या ऋतूमध्ये आपल्या त्वचेला उन्हाळ्यात जपणं, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर पुरळ, टॅनिंग, रोझेशिया, अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागू सकते. या ऋतूमध्ये त्वचेची घ्यावयाची काही बेसिक काळजी..


भरपूर पाणी
आपल्याकडे उन्हाळा म्हणजे घाम. या घामातून आपण घालवतो शरीरातले पाणी, कित्येक मिनरल्स, आणि अनेक पोषक तत्वे. म्हणून ऊन्हाळ्यात शरीराला हायड्रेट करणं अतिशय महत्त्वाचं. या ऋतुमध्ये शक्य तितकं पाणी, सिझनल फळांचा रस, नारळ पाणी, लिंबू पाणी याचा उपयोग करावा. यामुळे फक्त त्वचा नाही तर शरीर रिजुव्हिनेट होण्यास ही मदत होते.

टॅनिंग
उन्हात सन टॅनिंग ही अतिशय कॉमन समस्या. उन्हात बाहेर पडल्याने ही समस्या उद्भवते. यासाठीचे काही सोपे घरगुती उपाय आहेत. त्यातील एक म्हणजे बटाटय़ाचा रस त्वचेवर चोळणे. बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट असल्याने त्वचा उजळ होण्यास मदत होते. तसेच मुलतानी माती आणि खोबरेल तेलाची पेस्टसुद्धा टॅनिंग उतरवण्यास मदत करते. दही आणि कोरफड किंवा काकडीच्या रसाची पेस्टही सनबर्न दूर करून त्वचा थंड करते.

फेशियल
उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेणे म्हणजे एक कसरतच असते. पण त्यावर सोपा उपाय म्हणजे त्वचेचे उन्हापासून संरक्षण करणे. पण दिवसभराच्या धावपळीतून आपल्या तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी दिवसातून किमान दोनवेळा तरी चेहरा पाण्याने स्वच्छ करावा व चेहऱ्यावर पाण्याचे सपकारे मारावे.
दोन चमचे संत्र्याच्या रसात चंदनाची पावडर मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे व थोडय़ा वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवावा यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात चेहरा मऊ व तजेलदार राहण्यास मदत होते.

टीप्स-
उन्हाळ्यात आपल्या आहारात योग्य प्रकारचे पदार्थ असावेत. तसेच गरम पदार्थ खाण्याचे टाळावे.
जास्तीत जास्त पाणी प्यावे कारण आपल्या शरीरातून घामाच्या माध्यमातून पाणी बाहेर टाकले जाते.
सकाळ व संध्याकाळ या वेळातील सूर्यकिरणे आपल्या त्वचेसाठी चांगली असतात.
जास्तीत जास्त प्रमाणात घरगुती सौंदर्यप्रसाधने वापरावीत.
जास्तीत जास्त प्रमाणात आहारात फळे वापरावीत.
आपला चेहरा दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाण्याने धुवावा.
आपल्या शरीराला पोषक नसणारे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
उन्हाळ्यात चेहरा गार पाण्याने धुवावा.
दिवसातून कमीत कमी दोनदा तरी चेहरा ग्लिसरीन किंवा गुलाबजलने साफ करावा.  
जास्त उन्हामध्ये फिरणे टाळावे. बाहेर गेल्यास सनस्क्रिनचा वापर करावा. शक्य असेल तर छत्री, कॅप बाळगावे.
जर तुमची त्वचा जास्त रुक्ष असेल तर साबणाचा अती वापर करू नये, फक्त पाण्याने चेहरा धुवावा.
उन्हाळ्यात कॉफी व मद्यपान करणे टाळावे.
काकडीचा आणि कलिंगडाचा रस सम प्रमाणात घेउन तो एकत्र करून चेहऱ्यास लावावा.
उन्हाळ्यात घामामुळे त्वचा चिकट होते आणि त्यावर धुळीचे कण चिकटतात. यामुळे बॅक्टेरिअल अ‍ॅक्शन होऊन मुरूम, पुरळ अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. हे टाळण्यासाठी स्क्रबींग आवश्यक आहे. त्याशिवाय चंदन आणि काकडीच्या रसाचा वापरसुद्धा त्वचेला थंडावा देण्यास मदत करतो.
सकाळी नाष्टय़ाबरोबर ताक प्यावे त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात कलिंगड, अननस, संत्र, मोसंब, खरबूज, ताडगोळे, काकडी या ८०% ते ९०% पाणी असणाऱ्या फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे.
शक्यतो मांसाहार टाळावा.
रात्री झोपण्यापूर्वी सब्जाचे बी भिजत घालावे व ते सकाळी दुधातून घ्यावे.
उन्हाळ्यात चहाचे प्रमाण कमी करावे. साध्या चहाऐवजी ग्रीन टी अथवा हर्बल टीचे सेवन करावे.
या दिवसांत कैरी, रातांबे ही फळं सहज उपलब्ध होतात तेव्हा कैरीचे पन्हं, रायतं, कोकम याचा आहारात सामावेश करावा.

घरगुती फेसपॅक
दोन चमचे संत्र्याच्या रसात चंदनाची पावडर मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे व थोडय़ा वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवावा यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात चेहरा मऊ व तजेलदार राहण्यास मदत होते.
कोरफडीच्या पानांचा रस उन्हामुळे काळ्या झालेल्या त्वचेवर वीस मिनिटे लावावा व नंतर थंड पाण्याने धुवावा त्यामुळे त्वचा उजळते.
सौंदर्य प्रसाधनांच्या वापराबरोबरच पौष्टिक व संतुलीत आहार घेणे ही अतिशय महत्त्वाचे असते. उन्हाळ्याच्या दिवसात जंक फूड, तेलकट व तूपकट पदार्थ खाण्याचे  टाळावे. फळे, पालेभाज्या, कडधान्ये यांचा आपल्या आहारात समावेश करावा.
तेलकट त्वचेला तजेला आणण्याचा सोपा घरगुती उपाय म्हणजे बदाम व मध यांची पेस्ट चेहऱ्यावर थोडा वेळ लावून चेहरा थंड पाण्याने धुवावा.
दोन चमचे लिंबाचा रस व दोन चमचे काकडीचा रस यांचे मिश्रण आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावल्यास चेहरा टवटवीत राहण्यास मदत होते.
२-३ कप साध्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या मिसळून हे मिश्रण उकळून घ्यावे. व त्याची वाफ चेहऱ्यावर घ्यावी व नंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते.
रुक्ष त्वचेवर दूध व लिंबाचा रस यांचे मिश्रण लावल्यास त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.
फोटो : आशिष सोमपुरा / मॉर्डल : वैभवी
संकलन सहाय्य : ऋता, भाग्यश्री, मानसी, विद्या, प्राची