उन्हाळ्यातही रहा 'कूल'

 खालील लेख सकाळ  च्या सौजन्याने

केतकी इतराज (आहारतज्ज्ञ)

उन्हाळा ....... हा काळ लहानग्यांच्या निवांत सुट्टीचा आणि मोठ्यांच्या परीक्षेचा. मुलांचं खेळणं, उनाडक्‍या, दंगा-मस्ती, सहलींचे बेत. पण ऑफिस सांभाळत हे सारं प्लॅनिंग करायचं आणि मुलांच्या तब्येतीचीही काळजी घ्यायची. ही तारेवरची कसरत सांभाळत कसा करायचा उन्हाळा सुखद?

लवकर होणारी सकाळ, अंगाला चटके बसावेत अशी वाढणारी उन्हाची तीव्रता आणि घामाची चिकचिक म्हणजे उन्हाळ्याचं खरं आगमन. या बदलाचा हा मधला काळ बहुतेक वेळा त्रासदायक ठरतो. बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. मात्र लहान मुलं, खूप वयस्कर माणसं यांना हवेतील या बदलांशी जुळवून घेणं कठीण जातं. बऱ्याचदा डोळ्यांची आग आग होणं, डोकेदुखी, ताप येणं, उलट्या, जुलाब, अशक्तपणा अशी लक्षणं दिसून येतात. शरीरात होणाऱ्या या बदलांमुळे अन्नावरची वासना उडणं, भूक न लागणं, खाल्लं तरी पचन न होणं अशा तक्रारी सुरू होतात आणि मग जिथे शरीराला खरंच ताकदीची गरज असते तिथे आवश्‍यकतेनुसार ऊर्जा मिळत नाही. यामुळे अधिकाधिक थकवा वाढून यातून शरीर उभारी धरण्यापेक्षा हे त्रास अधिकाधिक बळावत जातात आणि हे दुष्टचक्र असंच चालू राहतं. हे मधेच कुठे तरी थांबवणं क्रमप्राप्त ठरतं.

शरीरात निर्माण होणारी पाणी, क्षार आणि इतरही पौष्टिक तत्त्वांची कमतरता वेळीच भरून निघाली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. अगदी जिवावर बेतण्यापर्यंतसुद्धा! म्हणून आहाराची गुरुकिल्ली या काळात विशेषत्वाने जपावी.

*   केवळ भूक नाही म्हणून न खाणं, किंवा दिवसभरातून काहीच खाल्लं नाही, काही तरी खायलाच हवं म्हणून खाणं, हे बदलायला हवं. या काळात शरीरातील चयापचयाची गती मंदावलेली असते. म्हणूनच हलका, पचनास सोपा आहार घ्यावा.

*   सकाळची सुरुवात मॉर्निंग वॉकने केली तर ताज्या, गार हवेने मन उल्हसित राहतं आणि नाश्‍त्याच्या वेळेपर्यंत भूकही लागते. ऑफिसला जाणाऱ्यांनी सकाळी हलका आणि साधा नाश्‍ता करावा. यात एखादी प्लेट पोहे, उपमा व त्याबरोबरच ग्लासभर ताजं ताक / फळांचा रस याचा समावेश करावा.

*   उपाशीपोटी कामाला गेल्यास बऱ्याचदा थकवा, गरगरणं यासारख्या गोष्टींमुळे कामाची सुरुवात करतानाच ती निरुत्साही, रटाळ अशी काहीशी होते. बऱ्याच लोकांची एकच तक्रार असते, खूप लो वाटतंय, कामच करू नयेसं वाटतंय. म्हणजेच कामात लक्ष न लागणं, एकाग्रता साधता न येणं यामुळे कामाच्या दर्जावरही परिणाम होत राहतो.

*   दोन्ही वेळच्या जेवणाबरोबरच मधल्या वेळी काही नाश्‍त्याचे पदार्थ, पातळ पदार्थ घेतले जाऊ शकतात. दिवसभरातून 4 ते 5 वेळा कमी तेलाचा, कमी मसाल्याचा हलका आहार घेणं कधीही श्रेयस्कर. खूप मसालेदार, मांसाहारी पदार्थ या काळात पचत नाहीत. उलट, पोटात गॅसेस होणं, जळजळ यांसारखे त्रास त्यामुळे होऊ शकतात.

*  
ऑफिसच्या कटिंग चहावर कंट्रोल ठेवणं ही एक खरंच आव्हानात्मक गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. थकवा घालविण्यासाठी, तरतरी येण्यासाठी हा चहा घेतला जातोच. शिवाय आल्या-गेल्या लोकांना सोबत करण्यासाठीही चहा-कॉफी सोबतीला असतात. परंतु दिवसभरातून 1-2 लहान कप इतकंच यांचं प्रमाण मर्यादित ठेवावं. याची जागा थंडगार ताक / लस्सी / ताज्या फळांचा ज्यूस यांसारख्या पदार्थांनी घेतली तर खऱ्या अर्थाने शरीराला तजेला मिळतो, शरीर आणि मेंदू टवटवीत राहण्यास मदत होते. कधी तरी पाण्याऐवजी सरबताची बाटली नेल्यास पाण्याबरोबरच आवश्‍यक ती साखर आणि क्षारही शरीराला मिळतात.

*  
ऋतुमानानुसार येणारी कलिंगडं, द्राक्षं यांसारख्या फळांचा आहारात नक्कीच समावेश असावा. या रसाळ फळांमधील साखर, जीवनसत्त्वं, तंतुमय पदार्थ, क्षार यांबरोबरच पाणीदेखील शरीराला यातून मिळतं. संध्याकाळच्या वेळी थंडगार फ्रूट प्लेट आणि त्यावर भुरभुरलेलं मीठ असा कूल बेत होऊ शकतो.

*  
विशेषकरून लहान मुलांच्या बाबतीत याबाबत पालकांनी आवर्जून लक्ष ठेवावं. जुलाब-उलट्या यांसारखा त्रास होत असल्यास जेवण पूर्णपणे बंद न करता थोड्या थोड्या वेळाने पातळ पदार्थ देत राहावेत. मऊ भात, भाताची पेज, नारळाचं पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत यांसारख्या पदार्थांचा वापर जरूर करावा. खूप अशक्तपणा असल्यास ग्लुकोजचं पाणी, साखर-मिठाचं पाणी द्यावं. ओआरएसची पाकिटंदेखील जवळपास सगळ्या औषधांच्या दुकानांत उपलब्ध असतात. त्यावरील प्रमाण पाळून ती पावडर वापरता येते. या काळात मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी आवर्जून काळजी घ्यावी. अति प्रमाणात लघवी होऊन शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास अशा रुग्णांना सर्वाधिक असतो. या संदर्भात आपल्या डॉक्‍टरांचं किंवा आहारतज्ज्ञांचं मत नक्कीच विचारात घ्यावं.

*   आहाराबरोबरच एकंदर काळजी घेणं आणि ऋतुमानानुसार आपल्या जीवनशैलीत बदल करणं नितांत गरजेचं ठरतं. माथ्यावर तळपणाऱ्या उन्हाने होरपळून निघाल्यासारखं होतं. वाढणाऱ्या दिवसाच्या कालावधीप्रमाणेच उन्हाची तीव्रतादेखील वाढू लागते. केवळ मल-मूत्रविसर्जनातूनच नव्हे, तर आपल्या त्वचेतून, घामातूनही बऱ्याच प्रमाणात शरीरातील क्षार आणि पाणी कमी होत असतं. म्हणूनच उन्हाळ्यात शक्‍यतो सुती, पांढरे कपडे वापरणं सोयीस्कर ठरतं. याने उष्णता कमीत कमी शोषली जाते. अंगभर कपडे किंवा डोक्‍याला स्कार्फ, हातमोजे, पायमोजे यांसारख्या पेहरावाने कमीत कमी त्वचा सूर्यप्रकाशाच्या डायरेक्‍ट संपर्कात येते. यामुळे उन्हाळ्यातील त्वचेचे विकार आटोक्‍यात ठेवता येतात.