उन्हाळ्यातील आहार

खालील लेख सकाळ मधुरांगण च्या सौजन्याने

प्रज्ञा केळकर

 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्षमता कमी होते. आहाराची काही पथ्ये पाळून ज्येष्ठ नागरिकांना उन्हाळा सुसह्य करता येऊ शकतो. त्यामुळे पचायला हलके असलेले पदार्थ खाणे हिताचे ठरते.

प्रत्येक ऋतूचे आपापले सौंदर्य असते. त्या त्या ऋतूत होणारा त्रास टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिक आनंद उपभोगू शकतात. उन्हाळ्याच्या बाबतीतही ही बाब तंतोतंत खरी आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत असते. त्यामुळे बऱ्याच व्याधी उद्‌भवतात. हलका आणि पौष्टिक आहार घेतल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासापासून ज्येष्ठांना सुटका करून घेता येते. या दिवसांमध्ये पचायला जड असलेला आहार घेतला तर पोट बिघडण्याची आणि अपचन होण्याची शक्‍यता असते. उन्हाळ्यात तेलकट, तुपकट आणि मसालेदार पदार्थ खाणे प्रकर्षाने टाळले पाहिजे. या दिवसांत जास्त मीठ खाल्ले तरीही त्रास होतो.

दिवसभर शक्‍य तेवढे जास्त पाणी प्यायल्याने शरीराला फारसा त्रास होत नाही. पाण्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि ते थंड राहते. दररोज 10 ते 15 ग्लास पाणी पिणाऱ्या व्यक्‍तीला डी-हायड्रेशनचा त्रास होत नाही, मात्र शक्‍यतो बाहेरचे पाणी पिणे टाळावे. कारण त्यामुळे शरीराला जास्त त्रास होतो. उन्हातून फिरून घरी आल्यावर असह्य होत असल्याने आपण लगेच गार पाण्याची बाटली तोंडाला लावतो. गटागटा पाणी प्यायल्यावर खूप बरे वाटते, मात्र आरोग्याच्या दृष्टीने ही सवय हानिकारक आहे. उन्हातून आल्यानंतर थोडा वेळ शांत बसून मग पाणी प्यावे. वारंवार थंड पेय पिण्याची सवयही चांगली नाही. कारण कोल्ड्रिंकमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्‌ज, रंग आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. अशा पेयांमुळे शरीरातील पाणी मलमूत्राच्या रूपात बाहेर पडते. सॉफ्ट ड्रिंकमध्ये फॉस्फोरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. त्याचा पचनक्रियेवर प्रभाव पडतो आणि शरीरातील मिनरल्सचे प्रमाण कमी होते.

उन्हाळ्यात लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी आणि ताक पिणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. या पेयांमुळे शरीराला गारवा मिळतो आणि पाणी घामाच्या रूपात बाहेर पडते. एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी ठरावीक अंतराने थोडे थोडे खात राहिल्याने शरीराला अपाय होत नाही. तसेच शरीराला अपाय होऊ नये यासाठी वडे, भजी, चिप्स असे पदार्थ खाणे टाळावे. कारण अशा पदार्थांमुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. टरबूज, खरबूज अशी फळे खाण्यापेक्षा संत्री, मोसंबी, कलिंगड अशा पदार्थांमुळे शरीराला गारवा मिळतो. उन्हाळ्यात पुदिना शरीरासाठी लाभदायक ठरतो.