चेर्नोबिल ते फुकुशिमा

 

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने

मोहन आपटे, रविवार, २४ एप्रिल २०११
‘किरणोत्सर्गी आयोडिन-१३१ थायरॉइड ग्लँडमध्ये साचून राहते आणि जीवघेण्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते. ‘चेर्नोबिल’ अपघातकाळात ‘बाल्या-पौंगडा-तरुण’ अवस्थेतील ज्यांनी किरणोत्सर्गाची बाधा झालेल्या दूध -चीज आदी पदार्थाचे सेवन केले अशा किमान सहा हजारांना थायरॉइड कॅन्सरचे मरण आले. आज अपघाताच्या २५ वर्षांनंतरही असंख्यांच्या जीवनात तो धोका अद्याप टळलेला नाही. ‘हिरोशिमा-नागासाकी’चे बळीसत्र पुढे निदान चाळीस वर्षे अव्याहत चालूच राहिले. फुकुशिमा येथील अपघाताने त्या दुर्दैवी घटनेचा दुसरा अध्याय लिहिला गेला आहे....
अमेरिकेच्या परमेश्वराचे नाव आहे ‘पैसा’! या पैशाच्या स्वरूपातील परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी त्या देशात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल करणारे उद्योग निर्माण झाले. त्यामध्ये जनरल इलेक्ट्रिक, वेस्टिंग हाऊस वगैरे उद्योग अणुक्षेत्रात अग्रगण्य आहेत. अरेवासारखा फ्रेंच उद्योगही या स्पर्धेत उतरला आहे. हे अणुउद्योग कोणत्याही देशाला ‘टर्न की बेसिसवर’ अणुभट्टय़ा बांधून देतात. अणू उद्योगाला सुगीचे दिवस आले असतानाच १९८६ साली या उद्योगांना एक जबरदस्त झटका बसला. त्या वर्षी सोव्हिएट रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टी उद््ध्वस्त झाली. त्यानंतर अणुभट्टय़ांची मागणी पार मंदावली. यावर उतारा म्हणून न्यूक्लिअर लॉबीने एक शक्कल लढविली आणि ‘ग्लोबल वॉर्मिग’नावाचा एक बागुलबुवा उभा केला, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिगमध्ये सत्य किती आणि तथ्य किती यावर सध्या रणकंदन माजले आहे. मात्र न्यूक्लिअर लॉबीची खेळी यशस्वी झाली. शुद्ध आणि स्वच्छ ‘कार्बन फ्री’ ऊर्जा हवी असेल तर अणुऊर्जेला पर्याय नाही, ही गोष्ट भल्या भल्यांच्या गळी उतरली. याच काळात पेट्रोलच्या भावांनीही उच्चांक गाठला आणि पुन्हा एकदा अणुऊर्जेला सोन्याचे दिवस येणार, अशी चिन्हे दिसू लागली. भारतासकट सर्व देश या अणूजत्रेत सामील झाले. परदेशी अणुउद्योगांना भारताची दारे सताड उघडण्याची भारताने तयारी दर्शविल्यामुळे ते आपल्या देशावर खूश होते. अशा चांगल्याचुंगल्या गोष्टी घडत असतानाच यावर्षी न्यूक्लिअर लॉबीला दुसरा जबरदस्त झटका बसला. जपानमधील फुकुशिमा येथील एक नाही तर तीन अणुभट्टय़ा त्सुनामीचे उद्ध्वस्त केल्या. साऱ्या जगात अणुऊर्जेच्या पुनर्विचाराची लाट उसळली. अशा परिस्थितीत आर्थिक बलवान असणाऱ्या न्यूक्लिअर लॉबीला झुकविणाऱ्या या दोन भीषण अपघातांचा विचार करणे अगत्याचे आहे.
२६ एप्रिल १९८६, बरोबर २५ वर्षांपूर्वी चेर्नोबिल येथील घडय़ाळे पहाटे १ वाजून २३ मिनिटे झाल्याचे दर्शवीत होती. अणुभट्टीचे तंत्रज्ञ चार क्रमांकाच्या अणुभट्टीवर प्रयोग करण्यात गुंतले होते आणि अचानक कर्णबधिर करणारा विस्फोट आसमंतात घुमला. चार क्रमांकाच्या अणुभट्टीने रुद्रावतार धारण केला होता. तीन किलोमीटर अंतरावरील प्रिप्यात शहर खडबडून जागे झाले. स्फोट इतका जबरदस्त होता की, त्याने अणुभट्टीवरील १००० टन वजनाचे छप्पर आकाशात उडवून दिले. अणुगाभ्याचा पार चोळामोळा झाला. आणखी तीन सेकंदांनी दुसरा स्फोट झाला. त्याने टनावारी किरणोत्सर्गी द्रव्ये आकाशात उधळली. आजूबाजूच्या वस्तूंना आग लागली. पुढे कित्येक दिवस अणुभट्टीतून किरणोत्सर्गी द्रव्ये आकाशात उसळत होती. हिरोशिमा क्षमतेच्या ५०० अणुबॉम्बचा एकाच वेळी स्फोट व्हावा, असा तो प्रसंग होता.
कीव्ह हे शहर युक्रेन देशाची राजधानी आहे. त्या शहराच्या उत्तरेला १३० किलोमीटर अंतरावर चेर्नोबिल हे गाव आहे. बेलारुस या देशाच्या सरहद्दीपासून ते केवळ ३० किलोमीटर अंतरावर आहे. अणुभट्टीवर काम करणारा नोकरवर्ग प्रिप्यात या शहरात राहत असे. १९८६ साली या आज स्वतंत्र असलेल्या दोन्ही देशांचा समावेश सोव्हिएट रशियात होता. त्या देशात साम्यवाद्यांचे एकतंत्री राज्य असल्यामुळे चेर्नोबिल स्फोटाची घटना आपल्या नागरिकांपासून आणि परदेशांपासून दडविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. परंतु किरणोत्सर्गी द्रव्ये वाऱ्याबरोबर स्वीडन आणि फिनलंड देशांपर्यंत जाऊन पोहोचली. तेव्हा सोव्हिएट रशियाच्या राज्यकर्त्यांनी लाजेकाजेस्तव तोंड उघडले.
चेर्नोबिल अपघाताने पहिल्या फटक्यात ३१ लोकांचा बळी घेतला. २६ एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत ५० हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. दोन आणि तीन मेपर्यंत आणखी ४५००० लोक आणि  ४ मेपर्यंत एकंदर १ लक्ष १६ हजार लोकांना परागंदा व्हावे लागले. अणुभट्टीतील आग शमविण्यासाठी आणि किरणोत्सर्गी द्रव्यांचा उद्रेक थांबविण्यासाठी अणुभट्टीच्या उघडय़ा पडलेल्या गाभ्यामध्ये हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने ५००० टन वस्तू ओतण्यात आल्या. त्यामध्ये बोरॉन, शिसे, वाळू, चिकणमाती,, डोलेमाइट, सोडियम फॉस्फेट वगैरे पदार्थाचा समावेश होता. एकंदर १८०० हेलिकॉप्टर उड्डाणांनी ही कामगिरी पार पाडली. पुढील एक वर्षांच्या काळात अणुभट्टीची साफसफाई करण्यासाठी दोन लक्ष लोकांना राबविण्यात आले.
आकाशात उधळलेली किरणोत्सर्गी द्रव्ये हळूहळू भूमीवर पडली. तेथून त्यांनी पाण्याच्या साठय़ांमध्ये आपला शिरकाव करून घेतला. तेथून ती जलचर प्राण्यांच्या शरीरात गेली. पिण्याच्या पाण्यातही त्यांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मासे आणि पिण्याचे पाणी यांच्यामार्फत त्यांनी मानवी शरीरात प्रवेश केला. जी द्रव्ये शेतीच्या क्षेत्रात पडली ती भूमीमार्फत वनस्पती, गवत आणि पिके यांच्यामध्ये प्रविष्ट झाली. तेच गवत गाईगुरांनी भक्षण केले. तेथून ही द्रव्ये दूध आणि गोमांस यांच्यामार्फत मानवी शरीरात प्रविष्ट झाली. याशिवाय श्वासोच्छ्वासामार्फत ती मानवी फुफ्फुसात जाऊन पोहोचली.
एकंदर मानवी शरीरावर आणि नवीन जन्माला आलेल्या बालकांवर या किरणोत्सर्गी द्रव्यांचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. एकंदरच कर्करोगाचे प्रमाण प्रभावित क्षेत्रात वाढले. मृत मुले जन्माला आली. काही मुलांचा जन्म हातपाय झडलेल्या अवस्थेत झाला. याशिवाय मतिमंद, विद्रूप अशी अनेक मुले जन्माला आली. मानसिक आघाताने अनेक जण खचून गेले.  पुढील पंधरा-वीस वर्षांत नेमके किती लोक मृत्यू पावले याबद्दल वादविवाद आहे. अणुऊर्जेची तरफदारी करणारे लोक ४००० असा अंदाज घेतात तर विरोधक ९३००० चा अंदाज देतात. कॅन्सरशिवाय इतर रोगांना किमान एक लक्ष लोक बळी पडले, असा ग्रीन पीस या संस्थेचा दावा आहे.
चेर्नोबिल येथील चारही अणुभट्टय़ा आता मृत झाल्या आहेत. त्यांच्यापासून ३० किलोमीटर त्रिज्येचे एक रिंगण काढले तर त्या परिसरात आता कुणीही राहत नाही. या परिसरातील सर्व घरेदारे आता रिकामी झाली आहेत. एकाच ठिकाणी अनेक  भूतबंगले असावेत अशी त्यांची अवस्था आहे. निसर्गानेही आता त्यांच्यावर आक्रमण केले आहे. या क्षेत्रातील जमीन आणि पाणी किरणोत्सर्गी द्रव्यांनी दूषित केल्यामुळे तेथे धान्यही पिकविता येत नाही. इथून-तिथून सारा भूप्रदेश भकास झाला आहे.
आता चेर्नोबिल अणुभट्टी क्रमांक- ४ जणू काही एका शवपेटिकेत बंदिस्त करण्यात आली आहे. हजारो टन सीमेंट ओतून तिचे एका थडग्यात रूपांतर करण्यात आले. आतून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गाची मुस्कटदाबी करण्यासाठी ही काळजी घेण्यात आली. आजही मृत अणुभट्टीच्या आत ४०० किलोग्रॅम प्लुटोनियम आणि सुमारे १८५ टन अणुइंधन आहे. आतल्या भागात हळूहळू ३००० घनमीटर पाणी साठले असावे असा अंदाज आहे. हळूहळू त्या भक्कम शवपेटिकेलाही तडे जाऊ लागले आहेत. तिची आयुर्मर्यादा ३० वर्षांची आहे. आता त्यावर प्रचंड आकाराची लांब -रुंद पोलादी कमान उभारण्यात येणार आहे. शवपेटिकेच्या आत केव्हा तरी पुन्हा एकदा आपोआप साखळीची प्रक्रिया सुरू होऊन ऊर्जानिर्मितीला प्रारंभ होईल, असा काही शास्त्रज्ञांचा अंदाज. अगदी अलीकडे चेर्नोबिल अणुभट्टीचे क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून खुले करण्यात आले आहे. पैसे मिळविण्याची आणखी एक युक्ती, दुसरे काय? आजही मृत अणुभट्टय़ांची देखभाल करण्यासाठी मजूर, अभियंते आणि शास्त्रज्ञ असा ३००० लोकांचा एक गट त्या परिसरात वास्तव्य करून आहे.
चेर्नोबिल अणुभट्टीच्या अपघाताला २५ वर्षे पूर्ण होतात न होतात तोच ११ मार्च २०११ रोजी जपानमधील फुकुशिमा येथील तीन अणुभट्टय़ा उद्ध्वस्त झाल्या. यावेळी निसर्गानेच मानवी तंत्रज्ञानाला आव्हान दिले. अणुभट्टय़ांच्या अपघातासाठी सातस्तरीय मापनप्रणाली मान्य करण्यात आली आहे. सातव्या पातळीवरील अपघात अतिभयानक मानला जातो. अशा अपघाताचा परिणाम अतिदूर अंतरापर्यंत आरोग्य आणि पर्यावरण यावर होतो. चेर्नोबिल अपघात सातव्या पातळीचा होता. फुकुशिमा अपघाताला प्रथम पाचवी पातळी देण्यात आली, पण आता ती वाढवून सातव्या पातळीवर आणण्यात आली आहे. चेर्नोबिल अपघाताप्रमाणेच फुकुशिमा अपघाताने काही सहस्र माणसे कर्करोगाला बळी पडतील असा अंदाज आहे.
‘आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुनमास’ अशी सर्वसामान्यांची मानसिक अवस्था असते. हिरोशिमा आणि नागासाकी येथील अणुबॉम्बनी घेतलेले लक्षावधी बळी, चेर्नोबिल, थ्री माइल आयलंड अशा घातक घटना, यामुळे मानवी मनात अणुऊर्जेसंबंधी एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. फुकुशिमा अपघाताने तिला आणखीनच खतपाणी मिळाले आहे. असे घातक तंत्रज्ञान आमच्या इथे नको, तुम्हाला पाहिजे असल्यास ते कराड किंवा बारामती इथे हलवा, अशी भावना होणे हा त्याचाच परिपाक आहे. शास्त्रज्ञांनी अणुऊर्जा अतिशय सुरक्षित आहे, असा कितीही धोशा लावला तरी ही भीती नष्ट होण्याची सुतराम शक्यता नाही. याचे कारण ती एक मानसिक रोगासारखी अवस्था आहे. फुकुशिमा अपघाताने देशोदेशी अणुऊर्जेच्या पुनर्विचाराचे एक वादळ उठले आहे. जर्मनीसारख्या औद्योगिकदृष्टय़ा प्रगत देशाने तत्परतेने आपल्या देशातील सात वृद्ध अणुभट्टय़ांचे कार्य स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो देश अणुऊर्जामुक्त होऊ इच्छितो.
शुक्रवार दिनांक ११ मार्च २०११ रोजी, जपानी वेळेनुसार दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी पॅसिफिक प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली सरकली. १४० वर्षांनी प्रथमच रिश्टर स्केलवरील ९ क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे सागराचे पाणी वर उसळले आणि त्सुनामी निर्माण झाली. जपानमधील सेन्दई शहराच्या पूर्वेला १२९ किलोमीटर व टोकियोच्या ईशान्येला ३७३ किलोमीटर अंतरावर, समुद्राच्या तळाखाली ३२ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. केवळ १५ मिनिटात त्सुनामीची राक्षसी लहर फुकुशिमा येथे येऊन पोहोचली. त्या ठिकाणी लहरीची उंची होती १२ मीटर (४० फूट).
फुकुशिमा येथे एकंदर सहा अणुभट्टय़ा होत्या. त्यातील क्रमांक ४, ५ व ६ या अणुभट्टय़ा डागडुजीसाठी ‘शटडाऊन’ करण्यात आल्या होत्या. फुकुशिमा अणुभट्टय़ांच्या संरक्षणासाठी सागर तटाला एक ५.७ मीटर (१९ फूट) उंचीची एक भिंत बांधण्यात आली होती. पण १२ मीटर उंचीच्या त्सुनामी लहरींनी ती लीलया ओलांडली आणि सागराचे पाणी अणुभट्टय़ांच्या परिसरात घुसले. कोणत्याही विपरीत परिस्थितीत अणुभट्टीचे कार्य आपोआप बंद व्हावे अशी योजना असते. त्यानुसार सर्व अणुभट्टय़ांचे कार्य स्थगित झाले. पण आवारात घुसलेल्या पाण्याने आपत्कालीन विद्युत यंत्रणा बंद पाडली. याच यंत्रणेमार्फत इंधनामधील पाण्याचा प्रवाह चालू राहतो. अणुभट्टी बंद झाली तरी इंधनामधील ऊर्जानिर्मिती थांबत नाही. त्यातच पाण्याचा प्रवाह तुटला तर इंधनाचे तापमान वाढत जाते. फुकुशिमा अणुभट्टय़ांमध्ये हीच स्थिती निर्माण झाली.
१२ मार्च या दिवशी क्रमांक-१ या अणुभट्टीचा स्फोट झाला, १४ मार्चला तीन क्रमांकाच्या भट्टीचा स्फोट आणि १५ मार्चला क्रमांक-१ मधून किरणोत्सर्गी द्रव्यांची गळती सुरू झाली. त्यामुळे तातडीने २० किलोमीटर परिसरातील दोन लक्ष लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सागराच्या पाण्याचे झोत सोडून अणुभट्टय़ा थंड करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर मुक्त झालेल्या किरणोत्सर्गी द्रव्यांनी घातक पातळी ओलांडली. प्लुटोनियमलाही गळती लागली. सरतेशेवटी ११५०० टन किरणोत्सर्गाने दूषित झालेले पाणी समुद्रार्पण करण्यात आले. त्यातच ७ एप्रिल रोजी ७.१ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला आणि ३० किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रातील सर्व लोकांना हलविण्यात आले. १२ एप्रिल रोजी अणुभट्टीच्या अपघाताची पातळी सातवर नेण्यात आली. चेर्नोबिल अणुभट्टीच्या अपघाताची पातळी तीच होती. अशा प्रकारे सुमारे एक महिना फुकुशिमा येथील अणुभट्टय़ा दोलायमान अवस्थेत राहिल्या. त्यामधून मुक्त झालेल्या किरणोत्सर्गी द्रव्यांमुळे पुढील काही वर्षांत सहस्रावधी नागरिकांना कर्करोगाची बाधा होईल, असा अंदाज करण्यात आला आहे.
अणुऊर्जा स्वच्छ, सुंदर आणि कार्बन फ्री असली तरी तिचे दुष्परिणाम लक्षात घ्या व तिचा फार हव्यास धरू नका, ‘अती सर्वत्र वर्जयेत’ असा धडा चेर्नोबिल आणि फुकुशिमा अपघातांनी आपल्याला दिला आहे.