कॅन्सरचा भयचकित करणारा इतिहास

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने

शशिकांत सावंत ,शनिवार, ७ मे २०११
रोजच्या आयुष्यातले छोटे-मोठे आनंदाचे क्षण आपण नेहमीच अनुभवतो. पण कॅन्सर किंवा तशाच असाध्य रोगाने ग्रासलेल्या मंडळींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मात्र ते अनुभवता येत नाहीत. त्यांना सतत या सावलीत वावरावे लागते. इतर सारेजण नॉर्मल असताना आपल्याच वाटय़ाला हे का? हा विचार त्यांना ग्रासून टाकतो. पण त्याच वेळी त्यांच्यासाठी शेकडो, हजारो डॉक्टर्स, नर्सेस, संस्था झगडत असतात. ‘द एंपरर ऑफ ऑल मालाडीज’  हे पुस्तक या झगडय़ाची कहाणी सांगते. अमेरिकेतील डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी यांनी हा कॅन्सरचा इतिहास लिहिलेला आहे.
कॅन्सर या आजाराला इतर अनेक आजारांप्रमाणेच हजारो वर्षांचा इतिहास आहे. इजिप्तच्या पिरॅमिडमधील ममीज पाहिल्यावर त्यातून काही प्रकारचे कॅन्सर लक्षात येतात. ख्रिस्तपूर्व ४४० मध्ये हेरोडेटस या ग्रीक इतिहासकाराने लिहिलेल्या इतिहासात अतोसा नावाच्या पार्शियन राणीला झालेल्या स्तनांच्या गाठीचे वर्णन कॅन्सरशी जुळते. पण खऱ्या अर्थाने कॅन्सरचे दस्तावजीकरण झाले ते १७९३ सालच्या मॅथ्यू बेल्डी याच्या शरीररचनेवरच्या पुस्तकात. यानंतर कॅन्सरशी सामना करण्याचे प्रयत्न कसकसे झाले हे लेखक सांगतो. या प्रयत्नात पारंपरिक गाठ काढून टाकण्यासारखी शस्त्रक्रिया ते कॅन्सरचे जिन्स शोधणे आणि त्यातून कॅन्सर शोधणारी, अटकाव करणारी जेनेटिक आजारातील औषधै इथपर्यंतचा हा प्रवास काही वेळा विलक्षण प्रवाही कादंबरीप्रमाणे तर काही वेळा अत्यंत गुंतागुंतीची पण अपरिहार्य भाषा वापरत लेखक सांगतो. अमेरिकन पत्रकार अनेकदा लिहिताना पात्रे महत्त्वाची मानून त्यांच्या कथा सांगत वार्तापत्र लिहितात. या पद्धतीमुळे लेखन जिंवत माणसांभोवती गुंफले जाते आणि ते शुष्क  वाटत नाही. कॅन्सर संशोधनाची प्रक्रिया सांगताना मुखर्जी यांनी त्या-त्या वैज्ञानिकांना/डॉक्टर्सना केंद्रस्थानी ठेवले आहे.
यातील पहिले डॉक्टर आहेत विल्यम हालस्टेड. १८८९ साली त्यांनी जॉन डॉपकिन्स हॉस्पिटलात कामाला सुरुवात केली. स्तनांच्या कॅन्सरसाठी अधिकाधिक भाग काढून टाकण्याची ‘रॅडिकल सर्जरी’ त्यांनी सुरू केली. पण तरीही कॅन्सर पुन्हा उद्भवतच होता. १९०७ पर्यंत त्यांनी काम केले आणि डाटा जमवला. १९०२ मध्ये रेडियमचा शोध लागल्यानंतर किरणोत्सर्गाचा मारा हा कॅन्सरवरील आणखी एक उपाय सापडला. पण घडय़ाळाला लावायच्या रंगात (काटे रात्री चमकावेत म्हणून) रेडियम मिसळल्यावर त्या कारखान्यात काम करणाऱ्यांना कॅन्सर झाल्याचे आढळले. साहजिकच रेडियमचा वापर धोकादायक ठरला. रेडियमचा शोध लावणारी मारी क्युरी रक्ताच्या कॅन्सरची बळी ठरली. १९३२ साली बिव्ही मेयर हा सर्जन मरण पावल्यावर त्याचे पत्र सर्जनच्या बैठकीत वाचून दाखविण्यात आले. त्यात त्याने कॅन्सर उपाय एका टप्प्यावर पोहोचल्याने नवी दिशा हवी आहे हे ओळखले होते. प्रत्येक उपचारानंतर जर जैविक व्यवस्थेचे रोपन शरीरात करता आले तर अधिकाधिक रुग्ण शस्त्रक्रियेनंतर तसेच निरोगी राहू शकतील.
कॅन्सर म्हणजेच पेशीची वेगाने न थांबता होणारी वाढ. ही वाढ रोखू शकेल असे एखादे औषध निघू शकेल काय, हा विचार त्यानंतर सुरू झाला. त्याचा अलीकडे पॉल एहरलील या वैद्यक विद्यार्थ्यांने कापूर कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या रंगीत डायवर संशोधन करून डाम पेशींमधील काही रसायनांशी एकजीव होते आणि काहींना वगळते हे १८७८ साली शोधले. त्यावर काम करत करत विशिष्ट जीवाणू नष्ट करू शकणाऱ्या डायवर संशोधन केले आणि १९१० साली गुप्तरोगाचे जीवाणू नष्ट करणारे औषध तयार केले. पण कॅन्सरवर याचा उपाय चालत नव्हता. कारण कॅन्सर पेशीवर हल्ला करणारे औषध निरोगी पेशीही निकामी करीत होते. त्याच्या ‘स्पेशल ऑफिनीटी’च्या सिद्धांताने त्याला नोबेल मिळवून दिले, पण विशिष्ट रसायने विशिष्ट पेशींबद्दल ओढ दाखवतात हा सिद्धांत कॅग्सरला लागू पडत नव्हता. ‘ओढी’ऐवजी ‘दुरावा’ ही संकल्पना तिथे काम करायला हवी होती. निरोगी पेशी आणि आजारी पेशी यातला फरक कळण्यासाठी पेशीरचनेवर काम आवश्यक होते.
२ डिसेंबर १९४३ साली दोस्तांच्या सैन्यावर नाझी सैन्याने हल्ला केला. त्यातील एका जहाजात विषारी वायू होता. त्यामुळे  सैनिक मरण पावले. हा वायू त्वचा भाजून काढे, पण तो पांढऱ्या पेशींवर हल्ला करीत असे. याला ‘क्लमार्स इफेक्ट’ म्हणतात. पांढऱ्या पेशी आणि रक्त तयार करणाऱ्या बोन मॅरोला नष्ट करीत असे. येल विद्यापीठातल्या लुईस गुडमन आणि आल्फ्रेड गिलमन यांनी या गुणधर्मावर लक्ष केंद्रित केले. यामुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यात आल्या तर? १९४२ मध्ये गुस्ताफ लिंडकाँग या ४० वर्षांच्या कॅन्सर रुग्णावर याचा प्रयोग करण्यात आला. माणसात आणि उंदरांमध्ये केलेल्या प्रयोगात सुजलेल्या कॅन्सर पेशीना आलेली सूज उतरल्याचे दिसून आले, पण पुन्हा कॅन्सर उद्भवलाच.
यानंतर डॉ. सिडने फार्बर याने कॅन्सरसाठी पेनिसीलिन ज्या प्रकारे रोगांवर वरदान ठरते, तशा औषधाचा शोध सुरू केला. त्याचवेळेस कॅन्सरविषयी जागृती आणि प्रचार करण्याचे काम मेरी लास्फर या महिलेने केले. कॅन्सर पूर्ण कसा शोधता येईल यावर काम करण्यात आले. अक्षरश: लाखो माणसांचा डाटा गोळा करण्यात आला. विशेषत: गर्भाशयाच्या कॅन्सरची सूचना मासिक पाळीतील रक्तस्रावातून कितीतरी आधी मिळू शकते, हे पापनी कोलाव याने सिद्ध केले. मॅमोग्राफी नावाचे तंत्रज्ञान स्तनांचा कॅन्सर रोखण्यासाठी विकसित झाले, ज्यात एक्स-रेचा वापर करून स्त्रियांची तपासणी करण्यात येई. १९७०च्या सुमारास  वेगवेगळ्या रसायनांचा मारा कॅन्सरच्या पेशींवर करण्याच्या प्रयोगांनी जोर धरला. यातच सात औषधांच्या एकत्रित रसायनाने अमेरिकेच्या एनसीआय या राष्ट्रीय प्रयोगशाळेत बर्कीट लिंफोमा हा टय़ुमर बरा करण्यात आला. हीच पद्धत म्हणजे केमोथेरपीची सुरुवात. १९७९ साली अमेरिकेत २० केंद्रे संशोधन उपचारासाठी उभारण्यात आली. त्याच सुमारास केमोथेरपीला यश येऊ लागले. मुलांवर आठ औषधांच्या मिश्रणाचा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वी झाला. १९८४-८५ मध्ये केमोथेरपीचे प्रयोग वाढले. तिच्या वापरावर ६००० संशोधन लेख प्रसिद्ध झाले. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाही कॅन्सरवरचा दुसरा उपाय सापडला.
ल्युकेमिया, रक्त कॅन्सर झालेल्या कार्ला हिला मे १९, २००४ रोजी मुखर्जींनी तिला तपासले. हा कॅन्सर बरा होण्यातला आहे, असे त्यांनी तिला सांगितले. पण तिच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वीसपट वाढले होते. ती उपचारांना प्रतिसाद देईल ही शक्यता कमी होती. पाच वर्षांनंतरच्या तिच्या स्थितीचे वर्णन मुखर्जी करतात. तिने धीराने कॅन्सरचा सामना कसा केला? ती मुखर्जीना सांगते- माझे मित्र मला विचारतात की या आजाराने तुझे आयुष्य अ‍ॅबनॉर्मल केलंय काय, मी त्यांना सांगते की जे आजारी असतात त्यांच्यासाठी ही नव्या नॉर्मल आयुष्याची सुरुवात असते. यानंतर कॅन्सर जेनोम प्रकल्पाची माहिती देऊन मुखर्जी पुस्तक संपवितात. मानवी जेनोम प्रकल्प हा महाकाय प्रकल्प होता. पण कॅन्सर जेनोम प्रकल्प ज्यात कॅन्सर संबंधातलं जीन्स, त्यांच्या प्रक्रिया आणि कॅन्सरला उद्युक्त करणारी पावल यांचा शोधणे हा प्रकल्प १०० वर्षे चालणारा आहे, असे ते सांगतात.
हे पुस्तक अर्थातच डॉक्टरांना अधिक उपयोगी ठरू शकेल, पण प्रामुख्याने ते सामान्य माणसांसाठी लिहिले गेलेले पुस्तक आहे. पुस्तके, संशोधन, रुग्णांशी संवाद, डॉक्टर्सशी संवाद यातून हे पुस्तक मुखर्जी यांनी साकारले आहे. ५७० पानी पुस्तकातील जवळजवळ शंभर पाने नोंदींनी व्यापलेली आहेत. यावरूनही मुखर्जी यांच्या कामाची व्याप्ती कळू शकेल अन्यथा पुलित्झर पुरस्काराने ती कळलेली आहेच.
द एंपरर ऑफ मालाडीज - सिद्धार्थ मुखर्जी
प्रकाशक : फोर्थ इस्टेट, लंडन
पृष्ठसंख्या- ५७०
किंमत : ४९९ रु.